बी-डी विंग करणार वर्षाला १२ लाखांहून अधिकची वीज बचत
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
वाकड (पुणे ) :- दत्त मंदिर रस्त्यावरील यशवन गृह प्रकल्पातील बी आणि डी विंग सोसायटीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्वपुर्ण पाऊले टाकत उभारलेल्या ऑन ग्रीड सोलर प्रकल्पातुन वर्षाकाठी १२ लाखांहून अधिकची वीज बचत होणार आहे. या बचतीसह वर्षाला चार ते पाच हजार झाडे लावण्याच्या बरोबरीचे आदर्श काम त्यांच्याकडून घडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) युवा नेते राहुल कलाटे यांच्या हस्ते दोनही सोसायटीतील सोलर प्रकल्पांचे नुकतेच उदघाटन झाले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष ललित दोशी, अकूल पटेल, सचिव अभिजित भट्टाचारजी, योगेश शर्मा, खजिनदार अमोल घाडगे, श्रेयस टीकायेत, दिव्यांग घिवाला, श्रेयस अग्निहोत्री, विक्रम शेनवी, विनायक पाटील, राहुल भागवत, अमित हाबू, सौरभ पाल, पुजा चव्हाण, किशोर मिरकले, समर्थ शर्मा, अभिलाष गुप्ता, प्रमोद मुर्तडक, संग्राम कळमकर आदी समिती सदस्यांसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
बी विंगने १८ किलो व्हॅट क्षमतेचा सोलर ऑन ग्रीड प्रोजेक्ट उभारला आहे. दिवसाला सुमारे ९०, महिन्याकाठी २६०० युनिट वीज निर्माण होणार आहे. म्हणजेच महिन्याला सरासरी ४० हजार, वर्षाकाठी पाच लाख रुपयांहून अधिकची वीज बचत होणार आहे. एक हजार झाडे लावण्याच्या बरोबरीचा प्रकल्प आहे. तर डी विंगने २५ किलो व्हॅटचा प्रकल्प उभारला आहे. दिवसाला सुमारे शंभर, महिन्याकाठी ३ हजार युनिट वीज निर्माण होत असल्याने महिन्याला सुमारे ६० हजार वर्षाकाठी सुमारे सात लाख रुपयांहून अधिकची वीज बचत होणार आहे. म्हणजेच वर्षाकाठी २० टन ऑक्सिजनची निर्मिती केल्या सारखे आहे.
सबंध जगाला ग्लोबल वॉर्मिंगचा धोका असताना तो टाळण्यासाठी प्रत्येक माणसाने आपापल्या परीने योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. यशवन सोसायटीने पर्यावरण संवर्धन- संरक्षण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपुर्ण आणि आदर्श पाऊले टाकली आहेत. त्यांचा आदर्श सर्व सोसायटींनी घेऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा.- राहुल कलाटे – नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)