नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
प्रतिनिधी
मराठा उद्योजक लॉबी या सामाजिक उद्योजकीय संघटनेचा ७ व्या वर्धापन दिन सोहळा नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात १ डिसेंबर २०२४ रोजी दणक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मूळचे लातूरचे असलेले उद्योजक, लेखक मा. विजय गोपाळराव पवार यांना त्यांच्या उद्योजकीय कार्यासाठी आदर्श सामाजिक उद्योगमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री.विजय पवार लिखित बाराखडी उद्योजकतेची या पुस्तकाच्या माध्यमातून हजारो उद्योजक आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन मिळाले आहे. सदर पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होऊन हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले विजय पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमात इतर मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात आले. शुराय चहाचे पराग पाटील, मराठी पैसा चे फाऊंडर महेश चव्हाण, बिर्याणी कट्टा च्या स्वाती थोरात, तसेच आरोग्य क्षेत्रात सामाजिक स्तरावर कार्य करणारे मंगेश चिवटे यांचा देखील सन्मान करण्यात आला. २००० पेक्षा जास्त उद्योजकांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्विरित्या पार पडला. या सोहळ्यात मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद बढे , तसेच वैभव फरतडे, श्री कृषिराज चव्हाण, श्री चिंतेश्वर देवरे , श्री स्वप्नील काळे इ. पदाधिकारी उपस्थित होते.