सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
कोरोनाच संकट आता कुठे कमी झालं आहे,अशात आता मंकीपॉक्स हा नवा आजार .
भारतात जरी या आजाराचा रूग्ण अद्याप आढळलेला नसला तरी नागरिकांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचे कारण म्हणजे जगभरातील जवळजवळ १८ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत.
त्यासाठी खबरदारी म्हणून सोमवारी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने खबरदारीची पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेने सगळ्या रूग्णालयांना सतर्क केलं आहे.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंकीपॉक्सची लक्षणे दिसणाऱ्या आणि बाधित देशांमध्ये प्रवास करण्याचा इतिहास असलेल्या लोकांवर अधिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील जारी केल्या आहेत.तसेच केंद्राने आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. वरील अहवालानुसार, संशयित मंकीपॉक्सचे नमुने निदानासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवले जातील.
मंकीपॉक्स काय आहे आणि कुठे आढळतो?
मंकीपॉक्स विषाणू हा एक स्वयं-मर्यादित विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे.
हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात आढळतो. विषाणू अधूनमधून इतर प्रदेशांमध्ये निर्यात केला जातो.
आतापर्यंतची संख्या पाहता-
मंकीपॉक्सची आत्तापर्यंत सुमारे ९२ पुष्टी झालेली प्रकरणे आणि २२ संशयित प्रकरणे १२ देशांमध्ये तीन WHO क्षेत्रांमधून नोंदवली गेली आहेत.
खरतर या संबंधित अजून एकही मृत्यु झाला नसला तरीदेखील जगभरात जागतिक आरोग्य संघटनेकडुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आजाराची लक्षणे:-
तज्ज्ञांच्या मते ’मंकीपॉक्स’ हा एक दुर्मीळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जी सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहर्यावर पुरळ उठते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
संसर्गाचा धोका:-
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला या विषाणूचा लागण होऊ शकते. हा विषाणू मुख्यतः त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणीदेखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारेदेखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो.