सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेदिवशी मशिदींसमोर दुप्पट आवाजात लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याची घोषणा केली होती.त्यांनतर 12 एप्रिल रोजी झालेल्या ठाण्याच्या सभेतही राज ठाकरेंनी हीच घोषणा पुन्हा केली आणि आता 1 मे रोजी पार पडलेल्या औरंगाबादच्या सभेतही राज यांनी याबद्दलची आपली भूमिका आक्रमकपणे मांडल्याचं सर्वांना दिसून आले. या भाषणावेळी त्यांनी असे सांगितले कि मुस्लीम धर्मीयांची 3 मे रोजी रमजान ईद असल्याने तोपर्यंत आम्ही वाट पाहणार परंतु जर 4 तारखेनंतर जर तसेच राहिले तर ठिकठिकाणी मशिदींच्या अजानसमोर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात येईल.
त्यामुळे आज राज्यातल्या अनेक भागांमध्ये पहाटेची अजान हा भोंग्यांविना झाली आहे. रत्नागिरी, कल्याण सह अनेक मशिदींमध्ये अजान आणि नमाज पठण शांततेत करण्यात आली. धारावीतही पहाटेची अजान आणि नमाज पठण शांततेत पार पडलं.तसेच पंढरपूर शहरात ७ मशिदी आहेत,यातल्या कोणत्याही मशिदीवर भोंगा वाजला नाही. पंढरपूरमध्ये सर्वधर्म समभाव जपण्याची परंपरा आहे. पंढरपूरमधल्या मुस्लिम बांधवांनी भोंगे न वाजवता मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
पण अनेक ठिकाणी सकाळच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यात आली होती.तर, मुंबई आणि पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू झाली आहे. अनेक मशिदींबाहेर सरकारने कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ नोटिसा धाडल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांचे फोन लागत नाहीत. तर काहींची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या दरम्यान मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.