सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
आज संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा विजय घडलेला आहे तो म्हणजे, देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मूर्मू या शपथ घेणार आहेत.खरतर त्यांनी अनेक संकटांचा सामना करत राष्ट्रपती भवनापर्यंतचा आपला प्रवास केला आहे.संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे कारण, एक महिला अनेक संकटांना तोंड देत आणि संघर्ष करत राष्ट्रपती पदावर आपले नाव कोरते ही खरच अभिमानाची गोष्ट आहे.ते म्हणतात ना की यशाची पायरी गाठण्यासाठी कोणताच प्रवास सोपा नसतो.अगदी तसाच खडतर प्रवास आपल्या नवीन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचा आहे.
अनेक संकटांचा सामना करत त्यांनी राष्ट्रपती भवनापर्यंतचा आपला प्रवास केला आहे. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्याने त्या पूर्णपणे कोलमडल्या होत्या. पण त्यांनी पुन्हा जिद्दीने आपल्या स्वप्नांना उभारी देत त्या पुन्हा उभं राहून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहिल्या.
ओडिशा राज्यात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुर्मू यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक चढउतार याबद्दल अनेकांना माहिती नाही. खरतर एका सर्वसाधारण महिलेचा राजकारणातील प्रवासही उल्लेखनीय आहे. कारण आदिवासी कुटुंब, एक शिक्षक आणि आता देशाच्या सर्वोच्चपदावर विराजमान अशी द्रौपदी मूर्मू यांची कारकिर्दी नक्कीच सोपी नव्हती.
द्रौपदी मूर्मू यांचा जन्म आणि शिक्षण:-
ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात मुर्मू यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण मूळ जिल्ह्यातूनच पूर्ण केलं. आणि पुढे त्यांनी भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. आर्ट्स ग्रॅज्युएटचंशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली होती आणि काही वर्ष याच क्षेत्रात त्या काम करत राहिल्या. या दरम्यान त्यांनी आपली राजकीय कारकीर्द ही १९९७ मध्ये सुरु केली. १९९७ मध्ये पहिल्यांदा त्या नगरसेविका बनल्या.आणि त्यानंतर त्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्ष बनल्या.
द्रौपदी मूर्मू यांची राजकीय कारकीर्दीचा प्रवास:-
ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपच्या आमदार झाल्या.
त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान सरकारमध्ये मंत्रीही झाल्या. त्यांची वाणिज्य आणि वाहतूक मंत्री म्हणून निवड करण्यात आली.
त्यानंतर त्या ओडिशाच्या मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री बनल्या.
त्यानंतर त्यांनी विभानसभा निवडणुकीत पाऊल ठेवलं. आणि नंतर त्यांना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यांना २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवडलं. मागील वर्षी २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला.
कौटुंबिक जीवनातील आलेल्या अनंत अडचणी आणि त्यावर मात:-
मुर्मू यांचा खाजगी आयुष्यातील प्रवास अगदीच सोपा नव्हता, अनंत अडचणींचा त्यांनी सामना केला आणि आपले नाव राजकीय क्षेत्रात मोठे केले.
२००९ ते २०१५ या अवघ्या सहा वर्षात पती, दोन मुलं, आई आणि भाऊ असे जवळचे गमावले. मुर्मू यांना दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन मुलं होती. खरतर २००९ मध्ये मुर्मू यांच्या एका मुलाचं निधन झालं. आणि त्यानंतर लगेचच तीन वर्षांनी २०१२ मध्ये दुसऱ्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्या त्यामधून सावरत होत्याच की त्याआधी त्यांचे पती श्याम चरण यांचंही कार्डियक अरेस्टने निधन झालं. यासर्वांमधून त्यांनी स्वतःला सावरण्यासाठी त्यांनी योगा च्या मदतीने स्वतःला डिप्रेशन मधून बाहेर काढले आणि आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल करू लागल्या.
आता सध्या त्यांची मुलगी इतिश्री ओडिशातील एका बँकेत काम करते.
रायरंगपूरच्या जनतेचा उत्साह शिगेला:-
मूर्मू यांचं मूळ गाव असलेल्या रायरंगपूरच्या जनतेला त्या निवडून येणार असा विश्वास होता आणि हा विश्वास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पूर्ण झाला. आणि ही माहिती कळताच गावात २०००० लाडू बनवत ,रायरंगपूरच्या जनतेने मुर्मू यांच्या अभिनंदनासाठी १०० बॅनरही लावले आहेत.
त्याचबरोबर रायरंगपूरमध्ये व्यापाऱ्यांकडून ४०,००० लोकांना वाटण्यासाठी मिठाई बनवण्यात येत आहे. गावातील आदिवासी लोकांनी मुर्मू या राष्ट्रपतीपदी जिंकून येण्यासाठी पूजाही केली होती.