सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
आज सगळीकडे योगाचे महत्व आणि जागृती करण्यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.
योगा दिनाची सुरवात २०१५ पासून करण्यात आली आणि २१ जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय “योग दिन” म्हणून साजरा करण्यात आला.
यावर्षी २१ जून २०२२ ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने केंद्रीय आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील ७५ प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे.संपूर्ण देशभरातील ७५ प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या ‘झिरो माईल्स’च्या नागपूरचीही निवड झाली आहे. केंद्रीय दळवळण व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूरमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुढाकाराने हा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२२ ची थीम अशी आहे:-
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भारतीय आयुष मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम निवडली आहे. यावेळी ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’ (Yoga For Humanity) ही आंतरराष्ट्रीय योग दिन २०२२ ची थीम म्हणून निवडण्यात आली आहे. ज्याचा अर्थ मानवतेसाठी योग आहे.
आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित करत त्यांनी यावेळी सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, ‘आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकतेचा दिवस आहे. जो विश्व बंधुत्वाचा संदेश देतो. यंदाचा योग दिवस कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचा योग आहे. आपली इम्युनिटी चांगली असेल तर आजारावर विजय मिळवू शकतो.
प्राणायममुळे शरिराची स्ट्रेंथ वाढते. हे प्रभावी आहे. प्राणायमचे अनेक प्रकार आहेत. प्राणायमचा तुमच्या व्यायामात समावेश करा.’
तसेच योगाचे महत्व सांगत पंतप्रधानांनी म्हटलं की, योगामुळे मानसिक शांती मिळते. सयंम आणि शक्ती देखील मिळते. प्रत्येक स्थितीत अडिग राहण्याचं काम योगा करतो. गीतेत योगाची व्याख्या करताना देवाने म्हटलंय की, कर्माची कुशलता हाच योग आहे. योगाच्या माध्यमातून जीवनात योग्य बनण्याची शक्ती मिळते. योगाला जीवनाचा भाग बनवला पाहिजे. तर आपण नक्की यशस्वी होऊ. नक्की विजयी होऊ.